प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी : कामगारांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने जेजुरी जिमा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या JIMA प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पानसरे टर्फ ग्राउंडवर १६ ते १८ तारखे दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी झाले असून, प्रत्येक संघाने अत्यंत चुरशीच्या लढती देत स्पर्धा रंगतदार केली आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन १६ तारखेला जिमा चे अध्यक्ष रामदास कुटे, उपाध्यक्ष पांडुरंग सोनवणे, तसेच रवी जोशी आणि पत्रकार नितीन राऊत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थितांनी खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल १ लाख रुपयांचे बक्षीस असून, त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आणि स्पर्धात्मकता पाहायला मिळत आहे. कामगारांसाठी खास आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे त्यांना आपल्या दैनंदिन कामातून विरंगुळा मिळत असून, क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान, या संपूर्ण उपक्रमासाठी आयोजक प्रमुख संभाजी जाधव आणि जावेद पानसरे यांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडत आहे.
आज या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असून, विजेतेपदासाठी दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अंतिम सामन्याकडे जेजुरीसह परिसरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















