प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : सासवड, ता. १ : सासवड शहरातील मध्यवर्ती आणि अत्यंत वर्दळीच्या जयप्रकाश चौकात पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावर दिवसभर शेकडो दुचाकी
चारचाकी, मालवाहू वाहने तसेच पादचारी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असल्याने येथे कधीही गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसामुळे खड्ड्याची तीव्रता अधिक वाढली असून त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत
नाही. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा अधिक धोकादायक ठरत असून दुचाकीस्वारांना अपघाताचा सामना करावा लागू शकतो. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी सासवड नगरपालिकेने या ठिकाणाची
तातडीने पाहणी करून खड्डा बुजविण्याची मागणी केली आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित
विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी
नागरिकांकडून होत आहे. वेळेत दुरुस्ती न झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















