प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या सासवड
पथकासह राजगड पोलिसांना यश आले आहे. २००३ मध्ये झालेल्या जुन्या खुनाचा बदला घेण्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी रात्री १०.२० वाजण्यापूर्वी शिंदेवाडी गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याच्या पुढे हॉटेल आमराईजवळ रस्त्याच्या कडेला संजय बाबूराव कडू-देशमुख आढळून आले. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर, तोंडावर व हातावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी
गौरव चंद्रकांत झेंडे (वय ३१, व्यवसाय भाजीपाला विक्री रा. पुणे) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१) तसेच शस्त्र अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
खूनप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व राजगड पोलिसांना समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सासवड पथक आणि राजगड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
तांत्रिक तपासातून मंथन दिनेश वैद्य (रा. सदाशिव पेठ, जोशीवाडा, पुणे) आणि सौरभ सागर परदेशी (रा. सदाशिव पेठ, जोशीवाडा, पुणे) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोन्ही आरोपींना १४ जुलै रोजी ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, या गुन्ह्यात मिझान गॅसउद्दीन शेख (रा. पर्वतीदर्शन, पुणे) आणि संदीप बाबुलाल कोरी (रा. पर्वतीदर्शन, स्वारगेट, पुणे) यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार दोघांनाही ताब्यात घेण्यात आले
पोलिस तपासानुसार, आरोपी मंथन दिनेश वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा २००३ मध्ये मृत संजय कडू-देशमुख यांनी खून केला होता. या जुन्या घटनेचा राग मनात धरून आरोपींनी सूडबुद्धीने संजय कडू-देशमुख यांची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
दरम्यान, आरोपी संदीप बाबुलाल कोरी याच्याकडून एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार विशाल दिवाणजी भोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिस पथकाची कामगिरी
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, राजगड
पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले, पोलिस उपनिरीक्षक युवराज धोंडे तसेच सहायक फौजदार संतोष तोडकर, किरण बर्काले, पोलिस हवालदार राजू मोमीन, संतोष भापकर
विशाल भोरडे, निलेश राणे, अडवाल, नाना मदने
गायकवाड, मयूर निंबाळकर, राजेंद्र मुंढे, प्रधान कोंढाळकर, पोलिस नाईक मेस्त्री, पोलिस कॉन्स्टेबल भालेराव, शिंदे, नलावडे व इतर अधिकारी-अंमलदारांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















