प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज : सासवड शहरातील खंडोबानगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणाला अडवून लोखंडी रॉड, दगड व लाकडी दांडक्याने
मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी सासवड पोलिसांनी १२ जणांसह चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शुभम यल्लापा गायकवाड (वय २४, रा. तारादत्त पश्चिम, सासवड) यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दिली
आहे. त्यानुसार विठ्ठल विजय खोमणे, राम राठोड, गणेश पवार, जितेंद्र ठोकळे, आर्यन सोळंकी, विरु साळंकी, श्रीनाथ खोमणे, समर्थ खोमणे, गुड्या शेलार, विकास मंडले, दत्ता शेलार, चिक्या भोंडे तसेच चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम गायकवाड हे शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलवरून सोपानकाका मंदिर ते हाडको रोडमार्गे
जात होते. कब्रस्तानासमोरील अंबाबाई मंदिर परिसरात विठ्ठल खोमणे हा लोखंडी रॉड घेऊन त्यांच्या मोटारसायकलसमोर आडवा आला. गायकवाड यांनी वाहन थांबविल्यानंतर गणेश पवार याने पाठीमागून येऊन त्यांचा गळा आवळल्याचा आरोप आहे
‘तू या रस्त्याने का आला?’ असे म्हणत शिवीगाळ करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल खोमणे याने लोखंडी रॉडने गायकवाड यांच्या डोक्यात मारल्याने दुखापत झाली, तर विरु साळंकी याने दगडाने पोटात मारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विकास मंडले याने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे
दरम्यान, इतर आरोपींनी हातापायांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. आरोपींनी शिवीगाळ करून परिसरात दहशत निर्माण केली. ‘मी इथला भाई आहे, आज तुला इथले कोण सोडवते ते बघतो
तुला सोडवण्यासाठी येणाऱ्यांनाही सोडणार नाही,’ अशी धमकी देत लोखंडी रॉड हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे
या प्रकारामुळे परिसरातील नागरिक घाबरून घरात पळाले व काहींनी घरांना आतून कड्या लावून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच फिर्यादी तेथून पळून जात असताना पोलिसांत तक्रार केल्यास ‘शंभर टक्के खल्लास करून टाकीन,’ अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम २०१३ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत. सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून आरोपींचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















