प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी
रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार, दि. १९ जुलै रोजी घडला. आरोपींनी कार्यालयात तोडफोड करून कोयता, पिस्तुल व लाकडी दांडक्यांनी दहशत निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी सात जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
याबाबत सतीश शंकर गायकवाड (वय ३६, व्यवसाय—खरेदी-विक्री, रा. भिवडी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक बाळासो बोरकर (रा. नारायणपूर), वेदांत कटके (रा. भिवरी), निखील कामठे, शुभम बडदे (रा. कोडीत), ज्ञानेश म्हेत्रे, नानजी उर्फ तुकाराम बडदे (रा. कोडीत) आणि सुरज जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास सासवड हद्दीतील बाळासाहेब भिंताडे यांच्या श्रीगणेश कार्यालयात फिर्यादी, त्यांचे भागीदार दिलीप भिंताडे व अन्य व्यक्ती जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारासंदर्भात बसले होते. त्यावेळी आरोपी तेथे आले. अलका जगताप यांची जमीन घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या भागीदाराला धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे
‘ही जमीन तुम्हाला द्यायची नाही. जास्त शहाणपणा करू नका, नाहीतर तुम्हाला इथेच गोळ्या घालतो. त्या जागेवर जायचे असेल तर आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. यावेळी अभिषेक बोरकर याने हातातील बंदूक टेबलच्या काचेवर आपटून काच फोडल्याचे, तर वेदांत कटके याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी मागे सरकल्याने हा वार चुकल्याचे पोलिसांनी सांगितले
दरम्यान, नानजी बडदे याने फिर्यादीच्या डोक्याला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी कार्यालयात तोडफोड करून दहशत निर्माण केली. कार्यालयाबाहेर आल्यानंतर कोयते व लाकडी दांडके हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याने परिसरातील दुकानदारांनी दुकानांचे शटर बंद केले, तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर फिर्यादी कसाबसा आरोपींच्या तावडीतून सुटून सासवड पोलीस ठाण्यात पोहोचला
पोलिसांची तत्काळ कारवाई; चार आरोपी ताब्यात
घटनेची माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने तीन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी बोपदेव रोडच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. आरोपी हिवरे गाव परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांना पाहताच काही आरोपी उसाच्या शेताच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून
कोडीत गावच्या परिसरातून वेदांत कटके, निखील कामठे, शुभम बडदे आणि ज्ञानेश म्हेत्रे या चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
घटनेनंतर आरोपी काळ्या रंगाच्या थार वाहनातून तसेच हुंदाई आय-२० कारमधून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सासवड पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियम व क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे करीत असून, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
अनेक आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपींवर सासवड, जेजुरी, फलटण, येरवडा व सोलापूर परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्यामध्ये खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, धमकी, शस्त्र कायदा तसेच दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.
“घटनेची माहिती मिळताच काही क्षणांत तीन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. यातील अनेक आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढील काळातही अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल,” अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















