प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज
जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात
महिलेने चोरून नेल्याची घटना रविवार (दि. १९) रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला
असून, याप्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत स्वाती अनिल नलवडे (वय ४२, रा. वाडे, ता. जि. सातारा) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नलवडे या रविवार
दुपारी श्री खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेत असताना गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण लबाडीच्या उद्देशाने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या दागिन्यात सोन्याची साखळी व त्यास पॅन्डल असून, त्याचे वजन सुमारे सव्वा तोळे आहे. या सोन्याच्या मिनी गंठणाची अंदाजे किंमत ५० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर
पोलिसांकडून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून, चोरी करणाऱ्या संशयित महिलेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
जेजुरी हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक दर्शनासाठी येत असतात. गर्दीच्या ठिकाणी चोरट्यांकडून भाविकांना लक्ष्य केले
जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मौल्यवान दागिने व वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. तसेच परिसरात एखाद्या
अनोळखी व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास तातडीने जेजुरी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार नांदे करीत आहेत.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















