प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणत्याही खाजगी
व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) संस्था तसेच छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यास किमान सात दिवस आधी माहिती देऊन प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची विधिवत परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्थांची सुरक्षा लक्षात घेता तसेच ड्रोनचा गैरवापर करून टेहळणी अथवा अन्य बेकायदेशीर कृत्ये होण्याची शक्यता विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दौंड
बारामती आणि शिरूर तालुक्यात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाळू माफिया तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून ड्रोनचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत.
आदेशानुसार जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून तसेच तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या साधनांच्या
वापरावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आवश्यक परवानगीशिवाय अशा साधनांचा वापर करता येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन करून पोलीसांच्या
पूर्वपरवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण किंवा उड्डाण करताना कोणी आढळल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २३३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील नागरिक, छायाचित्रकार, व्हिडिओग्राफर आणि इव्हेंट आयोजकांनी नियमांचे काटेकोर पालन करून
आवश्यक परवानगी घेतल्यानंतरच ड्रोनचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















