प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज: नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुकलीवरील लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येप्रकरणी
न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी समाधान व्यक्त केले पीडित चिमुकली आमच्या कुटुंबातीलच
असल्याच्या भावनेतून विशेष तपास पथकाने (एसआयटी) अहोरात्र परिश्रम घेतले. त्या मेहनतीला आज न्याय मिळाल्याचे समाधान आहे अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नसरापूर प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रसिंह गौर
पोलिस उपअधीक्षक राजेंद्र मायणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते तसेच एसआयटीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संदीपसिंह गिल म्हणाले की, १ मे रोजी हा अमानुष गुन्हा घडल्यानंतर २ मेच्या पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला
त्या वेळी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना आरोपीला कठोर शिक्षा होईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. त्यानुसार तपासाचे बारकाईने नियोजन करण्यात आले. प्रत्येक अधिकाऱ्यावर स्वतंत्र जबाबदारी
सोपवून तांत्रिक पुरावे, ई-साक्ष, सीसीटीव्ही फुटेज आणि वैज्ञानिक तपासाच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्यात आले. अवघ्या १५ दिवसांत तब्बल १,२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
ते पुढे म्हणाले की, न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन उन्हाळी सुटीत कामकाज सुरू ठेवले. त्यामुळे खटल्यात कोणताही अनावश्यक विलंब झाला नाही
अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच दुसऱ्या पंचनाम्यावेळी आरोपीला घटनास्थळी न नेता पोलिस ठाण्यातून व्हर्च्युअल पंचनामा करण्याची अभिनव पद्धत अवलंबल्यामुळे तपास अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण करता आला.
दरम्यान, विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी हा गुन्हा पूर्वनियोजित आणि अत्यंत क्रूर असल्याचे
सांगितले. आरोपी मीमराव कांबळे याने आधीच घटनास्थळाची रेकी करून आवश्यक साहित्य तेथे ठेवले होते गायीचे वासरू दाखवतो असे आमिष दाखवून त्याने तीन वर्षे दोन महिन्यांच्या चिमुकलीला गोठ्यात नेले
सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुमारे ३२ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने वारंवार अत्याचार केल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकरणातील सर्व तांत्रिक, वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
अॅड. मिसर यांनी आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडेही लक्ष वेधले. यापूर्वी ६५ वर्षीय महिलेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याची मुक्तता झाली होती. त्यामुळे त्याचे मनोबल वाढले असावे. या प्रकरणात आरोपीने मृत्यूनंतरही
चिमुकलीच्या मृतदेहावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. हा क्रौर्याचा कळस असून, यापेक्षा भीषण गुन्हा असू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले.
या निकालामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, अल्पावधीत काटेकोर तपास पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा मिळवून देणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















