प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या 25 वर्षीय केतन विशाल अगरवाल याच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचे तपासात समोर आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मृताच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे.
सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद
18 जून 2026 रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास लोहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला झुडपांमध्ये केतन अगरवाल याचा मृतदेह आढळून आला होता. केतन हा गहुंजे येथील रहिवासी असून त्याचे लग्न पुण्यातील सिया गोयल हिच्याशी ठरले होते.
घटनेनंतर सिया गोयल हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोघे किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
पोलिसांना आला संशय
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः लक्ष घालून सखोल चौकशीचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटू लागली. केतनच्या मृत्यूमागे मालमत्तेचा वाद किंवा प्रेमसंबंधाचे कारण आहे का, याचा शोध घेण्यात आला. त्यावेळी सिया गोयल हिचे अन्य व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली.
वडिलांच्या फिर्यादीनंतर खुनाचा गुन्हा दाखल
केतनचे वडील विशाल देवीचंद अगरवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सिया गोयल हिचे चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध असून दोघांनी संगनमत करून केतनला किल्ल्यावरून ढकलून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांनी केला.
या फिर्यादीवरून 23 जून रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103 आणि 61(2) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रेमसंबंधातून खुनाचा कट
तपासादरम्यान पोलिसांनी चेतन बाबुलाल चौधरी (वय 22, रा. कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांच्या माहितीनुसार चेतन चौधरी आणि सिया गोयल यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, सियाचे लग्न केतन अगरवाल याच्याशी ठरले होते. सियाला हे लग्न करायचे नव्हते आणि केतन त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याचे दोघांना वाटत होते.
त्यामुळे दोघांनी केतनचा काटा काढण्याचा कट रचला. नियोजनानुसार सिया गोयल केतनला फिरण्यासाठी लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली. त्याचवेळी तिने प्रियकर चेतन चौधरी यालाही गुपचूप तेथे बोलावून घेतले. योग्य संधी साधून दोघांनी मिळून केतनला किल्ल्यावरून खाली ढकलल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
तपासात पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी चेतन चौधरी याला अटक केली. त्यानंतर सिया प्रविण गोयल (वय 20, मार्केट यार्ड, पुणे) हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून रचलेला खुनाचा कट असल्याचे उघड झाले असून त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















