प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :सासवड, दि. ३ जुलै : आर्थिक अडचण आणि आईच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी घेतलेल्या कर्जाच्या मोबदल्यात बेकायदेशीर सावकारी
करून तब्बल ७० आर बागायती जमीन फसवणुकीने स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करत सासवड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी ऋषीकेश रामदास चांदगुडे (वय ३९, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे
त्यानुसार संदीप सुखदेव दळवी, महेश सूर्यकांत गायकवाड (दोघे रा. हिवरे, ता. पुरंदर) तसेच दिलीप भिंताडे (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम
३१८(४), ३५२, ३५१(२) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम ३९ व ४४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
फिर्यादीनुसार, आईच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी व स्वतःच्या आर्थिक अडचणीमुळे आरोपींकडून ५ टक्के मासिक व्याजदराने १७ लाख रुपये घेतले होते. या रकमेवर
नोव्हेंबर २०२४ ते एप्रिल २०२५ या सहा महिन्यांचे एकूण ५ लाख १० हजार रुपये व्याज रोख स्वरूपात दिले. त्यानंतर व्याजाचा भार कमी करण्यासाठी आणखी ९० हजार रुपये
रोख तसेच आरोपींच्या सांगण्यावरून दिलीप भिंताडे यांच्या फोनपे खात्यावर १ लाख रुपये पाठविण्यात आले. अशा
प्रकारे आरोपींना एकूण ७ लाख रुपये दिल्याचा दावा फिर्यादीने केला आहे
त्यानंतरही संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्यासाठी आवश्यक
रक्कम उपलब्ध न झाल्याने आरोपींकडून सातत्याने दबाव व धमक्या दिल्या जात असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. आरोपी जमीन बळकावतील तसेच वडिलांना
धमकावतील या भीतीपोटी आपण २६ जुलै २०२५ रोजी कोणालाही न सांगता घर सोडून गेल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, आपल्या अनुपस्थितीचा व वडिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत आरोपींनी कुलमुखत्यारपत्राच्या
आधारे बारामती तालुक्यातील मौजे आंबी खुर्द येथील गट क्रमांक १८९ मधील ७० आर बागायती जमीन पुरंदर दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत करून स्वतःच्या नावावर नोंदणी केली. संबंधित जमीन ही केवळ तारण म्हणून
कागदपत्रांसह दिली होती, मात्र फसवणूक करून ती स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पालवे हे करीत आहेत
दरम्यान या घटनेमुळे बेकायदेशीर सावकारीच्या माध्यमातून आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांचे शोषण होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















