प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज जेजुरीत गुरुवारी घडलेल्या एका घटनेने काही काळ भाविकांची धडधड वाढवली मात्र जेजुरी पोलिसांच्या सतर्कता, संवेदनशीलता आणि माणुसकीमुळे या घटनेचा शेवट सुखद झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवळी येथील काही भाविक श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी येथे आले होते. त्यांच्यासोबत तीन
वर्षांची स्वरांशी प्रभाकर गायके ही चिमुकलीदेखील होती. दर्शन आटोपून सर्वजण गडावरून खाली आल्यानंतर घाईगडबडीत आजी-आजोबा व इतर भाविक टेम्पोमध्ये बसून पुढील दर्शनासाठी आळंदीकडे रवाना झाले.
मात्र आळंदी येथे पोहोचल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की
स्वरांशी जेजुरीतच राहिली आहे. ही बाब समजताच आजी राहीबाई सुदाम गायके (वय ५५) व आजोबा सुदाम अण्णा गायके (वय ६०) यांच्यासह सर्व भाविकांची चिंता वाढली.
यावेळी टेम्पो चालकांनी जेजुरीतील परिचित सुरज चव्हाण यांच्याशी तातडीने संपर्क साधला. मुलीचे छायाचित्र व माहिती त्यांना पाठविण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरज चव्हाण यांनी तत्काळ जेजुरी पोलीस ठाण्याला माहिती दिली.
दरम्यान, जेजुरीतील सोनवणे पार्किंग परिसरातील एका रसवंतीगृहाजवळ ही चिमुकली आढळून आली. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यापूर्वी श्री मार्तंड देव संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी पाच ते सात या वेळेत मंदिर परिसरात ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार घोषणा
करून तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता.
माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता सर्वांचे मन जिंकणारी ठरली.
पोलीस हवालदार निता दोरके यांनी या चिमुकलीची आईच्या मायेने काळजी घेतली. तिला जेवण दिले, खेळवले आणि धीर देत तिचा वेळ आनंदात घालवला. पोलीस ठाण्यातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तिची योग्य
काळजी घेतली. त्यामुळे घरच्यांपासून दूर असूनही स्वरांशी सुरक्षित आणि निर्धास्त राहिली.
अखेर रात्री उशिरा आळंदीहून आजी-आजोबा जेजुरी पोलीस ठाण्यात पोहोचले. सुमारे साडेअकरा वाजता स्वरांशी पुन्हा आपल्या आजी-आजोबांच्या कुशीत परतली. हा भावनिक क्षण पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
जेजुरी पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनीही या प्रकरणात विशेष लक्ष देत आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी पोलीस कर्मचारी प्रसाद कोळेकर, योगेश चितारे, निता दोरके, उदय पवार, ठाणे अंमलदार तात्यासाहेब खाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते गिरीश झगडे उपस्थित होते.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















