प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल
२ जुलै रोजी जाहीर झाला. या निकालात सासवड येथील वाघीरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचा विद्यार्थी वेदांत साबळे याने ३०० पैकी २८४ गुण मिळवत राज्याच्या गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वीच त्याची सैनिक स्कूल, सातारा तसेच नवोदय विद्यालय, पुणे येथे प्रवेशासाठी निवड झालेली आहे.
यंदा इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील ५१ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी अनन्या भिसे (२४२), पूर्वा रासकर (२४०), सार्थ शिंदे (२३६), आरुष राऊत (२२६), अनुराज चाचर (२२४), शुभ्रा जगताप (२२४) आणि स्वराज पवार (२१८) या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्हा
गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. वेदांतसह एकूण आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यालयातील आठ विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी सिद्धी गजरे (२५८), अनघा जगताप (२२२) आणि सर्वेश लवांडे (२२२) यांनी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत शिष्यवृत्ती मिळवली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, शिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, मुख्याध्यापकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे शिक्षक शिवहार लहाने यांनी सांगितले. नियमित चाचण्या, विशेष मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून यशाचा आलेख उंचावत असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले की, शाळेत राबविण्यात येणाऱ्या विशेष शैक्षणिक उपक्रमांमुळे आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळे हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय
कामगिरीबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष राहुल मिरासदार, महामात्र सुधीर भोसले, उपमुख्याध्यापक शंतनू सुरवसे, पर्यवेक्षिका अर्चना लडकत यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिवहार लहाने, अप्पासाहेब कोकरे, गणेश पाठक आणि प्रज्ञा
पोटेगावकर तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मंगल कोकरे, प्रमोद ठुबे, दिपाली लांडगे आणि गौरी ढगे
यांनी मार्गदर्शन केले. वाघीरे विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि पालकवर्गातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















