प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज :
७८ लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद
तीन दिवसांच्या थरारक पाठलागानंतर शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
गुन्हा करून कितीही काळ फरार राहिले, ठिकाणे बदलली किंवा पोलिसांना गुंगारा दिला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटका नसते याची प्रचिती पुन्हा एकदा शिक्रापूर
पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईतून आली आहे. तब्बल ७८ लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी तीन दिवसांच्या अथक पाठलागानंतर चाकण येथून अटक केली.
सन २०२१ मध्ये बेकायदेशीर गुटखा विक्रीसाठी वाहतूक व साठवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना
मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे ७८ लाख रुपयांचा गुटखा व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर ९ जुलै २०२१ रोजी
या प्रकरणी बापू उर्फ प्रवीण शंकर गवते याच्यासह एकूण १३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच बापू उर्फ प्रवीण शंकर गवते (रा. गवते वस्ती, चाकण, ता. खेड) हा फरार झाला होता. तपासादरम्यान तो गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा
चालक असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी अनेकवेळा त्याचा शोध घेतला, मात्र तो सतत आपले ठिकाण बदलत असल्याने अटकेपासून बचाव करण्यात यशस्वी होत होता.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी शिक्रापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. याच मोहिमेदरम्यान
आरोपी चाकण परिसरात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, स्थानिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या मदतीने तीन दिवस सातत्याने त्याचा पाठलाग केला. अखेर अचूक सापळा रचत आरोपीला गवते वस्ती, चाकण येथून ताब्यात घेण्यात आले.
पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात यश आल्याने गुटखा तस्करीविरोधातील मोहिमेला
मोठे बळ मिळाले आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून या प्रकरणाशी संबंधित आर्थिक व्यवहार
पुरवठा साखळी आणि इतर आरोपींच्या नेटवर्कचा तपास पोलीस करीत आहेत.
“गुन्हा कितीही जुना असो, आरोपी कितीही चलाख असो; कायद्याचा हात त्याच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही,” हे या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह
अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस
निरीक्षक राहुल देशमुख, सोमनाथ कचरे, गणेश येळवंडे
नवनाथ केंद्रे आणि मयूर कुंभार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















